धनत्रयोदशी
धनत्रयोदशी कथा व पूजा
धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी असते. हा दिवशी लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. दिवाळी उत्सव चालू असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरुप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरु करण्याचा प्रघात आहे. (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यतः धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते.)
धनत्रयोदशी कथा :
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्नकरतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वासयांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
धनत्रयोदशी पूजा कशी करावी :
कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यांनी देवांना अमृत देऊन अमर केले. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. याच दिवशी यमाचीही पूजा केली जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे? :
भगवान धनवंतरीची पूजा करा.
घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करा.
सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी.
मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावावा.
तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी करा.
कार्तिक स्नान करून प्रदोष काळात घाट, गोशाळा, विहीर, मंदिर आदी स्थानांवर तीन दिवस दिवा लावा.
धनत्रयोदशी पूजेत काय करावे :
अ) कुबेर पूजन :
आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर नवीन गादी किंवा जुनी गादी साफ करून ठेवा. त्यानंतर नवीन बसण्याचे कापड टाका.
संध्याकाळनंतर तेरा दिवे लावून तिजोरीत कुबेराचे पूजा करा. कुबेराचे ध्यान करताना खालील मंत्र म्हणा...
"श्रेष्ठ विमानावर विराजमान, गरूडाप्रमाणे भासणारा, दोन्ही हातात गदा धारण करणारा, डोक्यावर श्रेष्ठ मुकुट करणार् या, भगवान शंकराचा प्रिय मित्र निधीश्वर कुबेर मी तुझे ध्यान करतो आहे."
खालील मंत्राद्वारे चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करा...
'यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये धन-धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ।'
नंतर कापूर आरती करून फुले अर्पण करा.
ब) यम दीपदान :
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा. गंध, पुष्प आणि अक्षतांनी पूजा करा आणि दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करा...
मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह ।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम ।'
आता ते सर्व दिवे सार्वजनिक स्थळावर लावा. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवा. अशा प्रकारे दीपदान केल्यावर यमाचा पाश आणि नरकातून मुक्ती मिळते.
यमराज पूजन :
या दिवशी यमासाठी एक पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा.
घरातील स्त्रियांनी रात्री दिव्यात तेल टाकून चार बत्त्या लावा. पाणी, पोळी, तांदूळ, गुळ, फूल, नैवेद्यासह दिवा लावून यम देवाची पूजा करा.
!! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक