परमवीर चक्र हा भारतीय सैन्यामध्ये युद्धकाळात दाखवलेल्या शौर्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.
परमवीर चक्र हे शत्रूच्या उपस्थितीत दाखवलेल्या उल्लेखनीय साहसासाठी जिवंतपणी तसेच मरणोत्तर दिले जाते.
परमवीर पुरस्काराची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली व हे पुरस्कार देण्याची सुरुवात 15 ऑगस्ट 1947 पासून करण्यात आली.
आतापर्यंत एकूण 21 परमवीर चक्र पुरस्कार देण्यात आले आहेत व यातील चौदा पुरस्कार हे मरणोत्तर देण्यात आले आहेत. तसेच यातील 20 परमवीर चक्र पुरस्कार हे भारतीय लष्करातील जवानांना मिळाले आहेत व एक पुरस्कार भारतीय हवाई दलातील जवानाला मिळाला आहे.
परमवीर चक्र हे जमिनीवर, हवेत किंवा समुद्रामध्ये शत्रू समोर असताना केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी तसेच आत्मत्यागाच्या पूर्वतयारीने दाखवलेले साहस व आत्मबलिदानासाठी दिले जाते.
परमवीर चक्र या पुरस्काराचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले.
परमवीर चक्र हे पदक वर्तुळाकार आकाराचे असून त्याचा व्यास 35 मिलिमीटर इतका असतो. हे पदक कांस्य धातूचे असून त्याच्या मध्यभागी भारताचे राष्ट्रीय प्रतीक कोरले आहे तसेच या चिन्हा भोवती चार वज्राच्या प्रतिकृती कोरल्या आहेत. या पदकाच्या मागच्या बाजूस परमवीर चक्र हे नाव देवनागरी व इंग्रजी लिपी मध्ये लिहिले आहे व या दोन्हीच्या मध्ये कमलाच्या प्रतिकृती कोरल्या आहेत. या पदकासाठी असणारी रीबन जांभळ्या रंगाचे असते.
जर परमवीर चक्र विजेता त्याच्या पुढच्या कारकीर्दीमध्ये पुन्हा परमवीरचक्रासाठी पात्र ठरत असेल तर परमवीर चक्राच्या रिबनवर यानंतरच्या प्रत्यक्ष शौर्यासाठी बार दिला जातो.
परमवीर चक्र हे लष्कर, नौदल, वायूदलातील अधिकारी, राखीव दल, मिलिशिया, प्रादेशिक सैन्यातील तसेच इतर सशस्त्र सैन्यातील अधिकारी यांना दिले जाते.
वरीलपैकी कोणत्याही सैन्यदलाच्या आदेशानुसार किंवा देखरेखीखाली सेवा देणारे नर्सिंग कर्मचारी, रुग्णालय व त्या संदर्भातील सेवा देणारे नागरिक यांना दिले जाते.
आतापर्यंत परमवीर पुरस्कार मिळवलेले २१ जवान :
१) मेजर सोमनाथ शर्मा : पहिला परमवीर चक्र पुरस्कार हा मेजर सोमनाथ शर्मा यांना मिळाला. 31 ऑक्टोबर 1947 रोजी बगदाम येथील पाकिस्तानी सैन्याने केलेला हल्ला परतवून लावताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते.
२) नाईक जदुनाथ सिंह : 6 फेब्रुवारी 1948 रोजी नाईक जदुनाथ सिंह यांनी अत्यंत कमी सैन्यबळासोबत ताईनधर येथे शत्रूचा मोठा हल्ला अत्यंत साहसाने लष्करी डावपेचांचा वापर करून परतवून लावला व या हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले.
३) सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे : 1947 च्या युद्धात गमावलेले झंगर हे गाव परत मिळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. राणे हे 72 तास न झोपता शत्रूचा सामना करीत भारतीय सेनेला मार्ग मोकळा करून देत राहिले व यामुळे भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला नामोहरम करून विजय संपादन केला.
४) नायक करम सिंह : 1948 च्या भारत-पाक युध्दादरम्यान 13 ऑक्टोबर 1948 रोजी चुंकी टिथवाल येथील पाक सैन्याचा हल्ला परतवून लावताना दाखवलेल्या अभूतपूर्व शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले.
५) मेजर पीरू सिंह : 18 जुलै 1948 रोजी पीरू सिंह यांनी तिथवाल येथील शत्रु सैन्यावर अत्यंत साहसी वृत्तीने हल्ला करून ते ठिकाण काबीज केले व या दरम्यान त्यांना वीरमरण प्राप्त झाले.
६) कॅप्टन गुरबचन सिंह : भारतीय सैन्य दलातील आफ्रिकेतील कांगो याठिकाणी पाठवलेल्या जवानांपैकी कॅप्टन गुरबचन सिंग हे एक होते. गुरबचन सिंग व त्यांचे सहकारी अशा एकूण 19 जवानांनी शत्रूशी अत्यंत साहसी वृत्तीने लढा दिला व यातच गुरबचन सिंग यांना लागलेल्या शत्रूच्या दोन गोळ्यांमुळे त्यांना वीरगती प्राप्त झाली.
७) मेजर धनसिंह थापा : 1962 मधील भारत चीन युध्दादरम्यान सिरीजैप येथे दाखविलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.
८) सूबेदार जोगिंदर सिंह : 1962 मधील भारत चीन युध्दादरम्यान अत्यंत शौर्याने चिनी सैन्याचा प्रतिकार केला व या दरम्यानच ते शहिद झाले.
९) मेजर शैतान सिंह : मेजर शैतान सिंह यांनी 1962 च्या भारत-चीन युद्धात दरम्यान चुशुल येथे चिनी सैन्याचा अत्यंत नेटाने प्रतिकार केला व यातच त्यांना वीरगती प्राप्त झाली.
१०) अब्दुल हमीद मसऊदी : कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल मसऊदी यांनी 1965 च्या भारत-पाक हल्ल्यामध्ये उल्लेखनीय शौर्याचे प्रदर्शन करीत पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली व या दरम्यानच त्यांच्या जीपवर गोळा पडून ते घायाळ झाले व त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते शहिद झाले.
११) लेफ्टनंट कर्नल ए. बी. तारापोर : 16 सप्टेंबर 1965 रोजी भारत-पाक युध्दादरम्यान अद्वितीय साहसाचे प्रदर्शन करीत लेफ्टनंट कर्नल तारापोर यांना वीरमरण प्राप्त झाले.
१२) लान्स नाईक अल्बर्ट एक्का : लान्स नायक अल्बर्ट एक्का या भारतीय लष्कर मधील जवानाला 1971 च्या भारत-पाक युध्दादरम्यान हीली येथील युद्धामध्ये पाकिस्तानी शत्रूशी सामना करताना वीरमरण प्राप्त झाले.
१३) फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंह : फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंह यांना 14 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या हवाई हल्ला परतवून लावताना वीरमरण आले.
१४) लेफ्टनंट अरुण खेतरपाल : लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांना 1971 च्या भारत - पाक युद्धादरम्यान वयाच्या एकविसाव्या वर्षी वीरमरण प्राप्त झाले.
१५) मेजर होशियार सिंह : मेजर होशियार सिंग यांना 1971 च्या भारत-पाक युद्धात दरम्यान जर्पाल या ठिकाणी दाखविलेल्या अभूतपूर्व शौर्यासाठी 1972 मध्ये परमवीर चक्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
१६) नायब सुभेदार बन्ना सिंह : 1987 मध्ये पाक सैन्याने सियाचीन येथे भारतीय हद्दीमध्ये उभारलेली कायदे चौकी ताब्यात घेण्यास नायब सुभेदार बाना सिंग यांनी धाडसी वृत्तीने दाखविलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र या सन्मानाने गौरविण्यात आले.
१७) मेजर रामस्वामी परमेश्वरन : 1987 मध्ये श्रीलंकामध्ये 25 नोव्हेंबर रोजी झालेला आतंकवादी हल्ला हाणून पाडताना मेजर रामस्वामी परमेश्वरन यांना वीरमरण आले.
१८) लेफ्टनंट मनोज कुमार पांडे : 1999 च्या कारगिल युद्ध मध्ये खालूबार मोर्चा यशस्वी करताना लेफ्टनंट मनोज कुमार पांडे यांनी असाधारण शौर्याचे प्रदर्शन करीत स्वतःच्या प्राणांची आहुती दिली होती.
१९) ग्रेनेडिअर योगेंद्रसिंह यादव : 4 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धादरम्यान टायगर हिलवरील बंकर्स ताब्यात घेताना ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव यांनी शत्रूसमोर असाधारण साहस आणि शौर्याचे प्रदर्शन केले.
२०) सुभेदार संजय कुमार : 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान पॉईंट फ्लॅट टॉप काबीज करताना संजय कुमार यांनी पाकिस्तानी शत्रूचा अत्यंत साहसाने प्रतिकार केला व विजय भारताकडे खेचून आणला. यासाठी त्यांना परमवीर चक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२१) कॅप्टन विक्रम बत्रा : 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान दाखवलेल्या अभूतपूर्व शौर्यासाठी कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्काराने गौरविण्यात आले.
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉