क्रांतीकारक उमाजी नाईक | उमाजी नाईक माहिती | Krantikarak Umaji Naik
७ सप्टेंबर १७९१ - ३ फेब्रुवारी १८३२

७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्याच्या भिवडी येथे रामोशी-बेरड समाजातील खोमणे कुटुंबात उमाजींचा जन्म झाला. स्वराज्याच्या पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी खोमणे कुटुंब पार पाडत होते, त्यामुळे त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. पुढे तेच त्यांचे आडनाव झाले.

लहानपणापासुनच उमाजींमधील करारीपणा पाहून भली भली लोक तोंडात बोटं घालायची. तरुण वयातच त्यांना पारंपारिक रामोशी हेरकलेचे ज्ञान मिळाले आणि अगदी काही काळातच उमाजी या कलेत पारंगत झाले. सोबतच त्यांनी वडील दादोजी नाईक यांच्याकडून कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण, दांडपट्टा, तलवार, भाला चालवण्याची कला अवगत केली.

एकीकडे उमाजी तयार होत असताना दुसरीकडे मराठी साम्राज्य लयास जात होते. इंग्रजांनी एव्हाना पुणे ताब्यात घेतले आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांबरोबर हातमिळवणी करत त्यांच्या सांगण्यानुसार कारभार सुरु केला.

दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेतले आणि आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाज उघड्यावर आला आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. इंग्रजांनी रयतेचे हाल हाल केले.

उमाजींचे तरुण रक्त झाल्या प्रकाराने उफाळले. त्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वराज्य पुन्हा परत आणेन अशी गर्जना केली आणि खुशाबा रामोशी, कृष्ण नाईक, बाबू सोल्स्कर आणि विठुजी नाईक यांना बरोबर घेऊन इंग्रजी सत्तेविरोधात बंडाचे निशाण फडकावले. महाराष्ट्राच्या मातीतील उमाजी नाईक हा देशातील पहिला वीर ठरला ज्याने इंग्रजी सत्तेच्या मनात दहशत निर्माण केली. त्यांनी श्रीमंतांची लुट सुरु केली आणि त्या लुटीतून ते गरीब प्रजेला मदत करू लागले.

प्रजेला प्रमाण मानून त्यांनी इंग्रजांविरुद्ध आपली लढाई सुरु ठेवली. परंतु १८१८ मध्ये ते इंग्रजांच्या हाती सापडले आणि त्यांना १ वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला. या काळात त्यांनी तुरुंगातून सुटल्यावर काय करायचे याची आखणी केली आणि बाहेर पडल्यावर आपला लढा अधिकच तीव्र केला. एव्हाना लोक देखील उमाजींच्या बाजूने उभे राहिले होते.

उमाजींच्या सततच्या कारवायांमुळे मेटाकुटीला आलेल्या इंग्रजांनी सासवड-पुरंदरच्या मामलेदारास उमाजींना कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेण्याचे आदेश दिला. आदेश मिळाल्याबरोबर मामलेदार इंग्रजांची फौज घेऊन निघाला. उमाजींच्या असंख्य टोळ्या होत्या. या सर्व टोळ्या दाट जंगलात राहत असतं. एका टोळीत जवळपास पाच हजार सैन्य असे. पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात मामलेदार आणि उमाजी यांच्यामध्ये मोठे युद्ध झाले आणि या लढाईत उमाजी आणि त्यांच्या साथीदारांनी रोमहर्षक विजय संपादन करीत इंग्रजांना पहिला जबरदस्त हादरा दिला.

२१ डिसेंबर १८३० ला उमाजींनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते तसेच काहींचे प्राण देखील घेतले होते. स्वराज्य पुनर्स्थापित करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमाजींनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजांविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला आणि त्यात नमूद केले, "मातीतील लोकांनी इंग्रजांच्या चाकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल." हा जाहीरनामा म्हणजे उमाजीने एकप्रकारे स्वराज्याचा पुकार केल्याचे प्रतिक ठरला. तेव्हापासून उमाजी रयतेचे राजे झाले. उमाजींच्या या अनपेक्षित खेळीमुळे बिथरलेल्या इंग्रजांनी आता मात्र भेदनीतीचा वापर करण्याचा मार्ग अवलंबिला. इंग्रजांनी उमाजीच्या नावे भलीमोठी बक्षिसे लावली आणि अनेकांना फितूर केले.

एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजींनी ज्याचा हात कापला होता तो काळोजी नाईक देखील सूडभावनेने इंग्रजांना जाऊन मिळाला. दुसरीकडे नाना चव्हाण याने देखील १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीनीच्या बदल्यात इंग्रजांचे पाय चाटले. या दोघांनी उमाजींची सर्व खबर इंग्रजांना दिली आणि उमाजी आपल्याच माणसांमुळे सापळ्यात अडकले.

१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्याच्या उतरोली गावात बेसावध असताना उमाजी इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस याच्या हाती लागले. इंग्रजांनी त्यांची कसून चौकशी केली, परंतु त्यांच्या हाती विशेष काही लागले नाही. उमाजींच्या खेळ्यांमुळे जेरीस आलेल्या इंग्रजांनी जास्त विलंब न लावता उमाजी नाईकांचे बंड संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. न्यायाधीश जेम्स टेलर यांनी इंग्रजी सत्तेविरोधात उठाव केल्याबद्दल उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा सुनावली. दिनांक ३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी उमाजींनी हसत हसत मृत्यूला आलिंगन दिल्रे.

इतर कोणीही पुन्हा कधीही इंग्रजांच्या वाट्याला जाऊ नये व लोकांच्या मनात आपली जरब बसावी म्हणून इंग्रजांनी सलग तीन दिवस कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला उमाजींचे प्रेत लटकावून ठेवले होते. पण इंग्रज त्यांनी पेटवलेली बंडाची आग काही शमवू शकले नाहीत आणि पुढे जे काही घडले तो इतिहास तुम्हाला ठावूक आहेच!

उमाजी नाईक यांची हीच शौर्यगाथा त्यांना आद्यक्रांतीकारकाची उपाधी देऊन गेली. खुद्द इंग्रज अधिकारीही त्यांच्या शौर्याचे कौतुक करून गेले आहेत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी राजासारखे राज्य स्थापणार नाही?"

तर उमाजींना पकडणारा मॉकिन टॉस म्हणतो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्यांना फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी राजाच झाला असता."

क्रांतिवीर उमाजी नाईक नामक महाराष्ट्राच्या या थोर क्रांतीपर्वाला मानाचा मुजरा !

संकलन : गिरीश दारूंटे, मनमाड

أحدث أقدم