महाराष्ट्राचा इतिहास | 1 मे महाराष्ट्र दिन मराठी भाषण | महाराष्ट्र दिनाची मराठी माहिती | 1st May Maharashtra Day Marathi Speech | 1st May Maharashtra Day Marathi Information

महाराष्ट्राचा इतिहास | 1 मे महाराष्ट्र दिन मराठी भाषण | महाराष्ट्र दिनाची मराठी माहिती | 1st May Maharashtra Day Marathi Speech | 1st May Maharashtra Day Marathi Information
इतिहास माझ्या महाराष्ट्राचा


महाराष्ट्राचा इतिहास...

महाराष्ट्रातील नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून उपलब्ध आहे. राजकीय कालखंडानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मोगल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.
नावाचा उगम : महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे ह्युएनत्संग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महा-कंतारा (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.
पहिले शेतकरी : मध्यपाषाणकालामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व ४००० मध्ये धान्याची लागवड तापी नदीच्या खोऱ्यात सुरू झाली. महाराष्ट्रातील जोर्वे येथे जे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमतः सापडले, ते इसवी सन पूर्व १५००चे आहेत. या संस्कृतीचे नाव त्या गावाच्या नावावरून ठेवले आहे. त्या गावात मुख्यतः रंगवलेली व तांब्यापासून बनवलेली भांडी आणि शस्त्रे सापडली. तेथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. तेथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली होती. ते विविध पिके उगवत होते. तेथील घरे मोठी चौकोनी, चटयांपासून व मातीपासून बनवलेली असत. कोठारांत व कणगीत धान्य साठवत असत. स्वयंपाक दोन कोनी चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस भाजले जाई.
मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य : महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे ३ऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगधसाम्राज्याचा एक भाग झाला. सोपारा हे बंदर (हे मुंबईच्या उत्तरेस असून आज नालासोपारा या नावाने ओळखले जाते) प्राचीन भारताच्या व्यापाराचे केंद्र होते. या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचीन या ठिकाणी व्यापार होत असे. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहनयांनी ख्रि.पू २३० २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठीभाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स ७८मध्ये गौतमीपुत्र सत्कारणी (शालिवाहन) हा महाराष्ट्राचा राज्यकर्ता होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही चालू आहे. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला. दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मोहंमद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. मोहंमद बिन तुघलक याने आपली राजधानी दिल्लीहून हलवून दौलताबाद येथे केली. बहमनी सुल्तानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले. १६व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मुघलसाम्राज्यांशी संलग्न असलेल्या अनेक इस्लामी राजवटींनी मध्य महाराष्ट्र व्यापलेला होता तर किनारपट्टीवर मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराच्या हेतूने आलेल्या पोर्तुगीज यांचा अंमल होता.
मराठा साम्राज्याचा उदय : छत्रपती शिवाजी महाराज - १६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजे भोसल्यांनी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणगड जिंकला आणि १७व्या शतकाच्या मध्यास पश्चिम महाराष्ट्रात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवाजीराजांमुळे प्रथमच विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मोगल साम्राज्याविरोधात स्वतंत्र मराठा राज्य उदयास आले. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराजांना १६७४ मध्ये राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना औरंगजेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. मोगलांनीसंभाजीराजांचे धाकटे बंधु राजाराम यांना दक्षिणेस पिटाळले. राजाराम भोसल्यांनी जिंजी किल्ल्याची दुरुस्ती १८व्या शतकाच्या सुरुवातीस केली, जेव्हा तेथील परिस्थिती सुधारली होती. राजारामांचे पुतणे शाहू भोसले हे १७०८ साली मराठी दौलतीच्या गादीवर बसले. या कामास त्यांचे पेशवे (मुख्य मंत्री) बाळाजी विश्वनाथ यांची साथ मिळाली. राजारामांची विधवा पत्नी ताराबाई यांच्याशी शाहू भोसले यांचे मतभेद होते. चार दशकांनंतर 'छत्रपतींच्या' (भोसले राजघराण्यातील) नावाने राज्यकारभार पाहणाऱ्या पेशव्यांच्या हाती मराठा साम्राज्याची सूत्रे आली. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले.
पेशव्यांचा काळ : बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव (पहिले) यांनी मराठा राज्य चालव ले. त्यांनी मोगल राज्यांकडून कर व सरदेशमुखी व चौथाई यांच्यासारखा सारा वसूल करण्याची प्रथा पाडली. पेशव्यांनी ग्वाल्हेर शिंदेंना, इंदूर होळकरांना, बडोदा गायकवाडांना तर धार पवारांना दिले. पेशव्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली (पानिपत), गुजरात (मेहसाणा), मध्य प्रदेश (ग्वाल्हेर, इंदूर), व दक्षिणेस तंजावरपर्यंत मराठी राज्य वाढविले. इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालींनी पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याचा एकसंधपणा नष्ट झाला व साम्राज्याची अनेक संस्थानांत विभागणी झाली. पेशव्यांचे माजी सरदार आपआपले राज्य सांभाळू लागले तर पुणे पेशवे परिवारांकडे राहिले. भोसल्यांची एक शाखा कोल्हापुरात शाहूच्या काळातच गेली होती तर मुख्य शाखा सातारा येथेच राहिली. कोल्हापूरचे भोसले म्हणजेच राजाराम महाराज यांचे वंशज. त्यांनी इ.स. १७०८ रोजी शाहूंचे राज्य अमान्य केले. १९व्या शतकापर्यंत कोल्हापूरच्या भोसल्यांनी छोट्या भूभागावर राज्य केले.
ब्रिटिशांना विरोध : ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स. १८१८मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांचे राज्य काबीज केले. सध्याच्या महाराष्ट्राचा विदर्भ आणि मराठवाडा सोडून इतर हिस्सा ब्रिटिशांच्या बॉम्बेप्रेसिडेन्सीचा एक भाग होता. बाँबे प्रेसिडेन्सीला मराठीत मुंबई इलाखा म्हणत. मुंबई इलाख्यात कराचीपासून ते उत्तर कर्नाटक (धारवाड, हुबळी, बेळगांव, कारवार, विजापूर) पर्यंतचे भूभाग समाविष्ट होते. अनेक मराठी राजे ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य संभाळीत होते. आजचे नागपूर, सातारा व कोल्हापूर हे त्या काळात विविध राजांच्या ताब्यात होते. सातारा इ.स. १८४८ साली मुंबई इलाख्यात तर नागपूर इ.स. १८५३साली नागपूर प्रांतात (व नंतर मध्य प्रांतात) सामील करण्यात आले. (वऱ्हाड) बेरार हा हैदराबादच्या निजामाच्या राज्याचा एक भाग होता. ब्रिटिशांनी इ.स १८५३ मध्ये बेरार काबीज केले व १९०३ मध्ये मध्य प्रांतात समाविष्ट केले. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांना सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोई-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उगारला, जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद होते.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती - संयुक्त महाराष्ट्र चळवळ : भारताला इ.स. १९४७ साली स्वातंत्र्य लाभले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरुन मराठी-जनात क्षोभ उसळला. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९ व्या शतकापासून विविध मराठी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी व समाजाने सामाजिक उत्क्रांती आणि राजकीय स्वातंत्र्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोलाचे योगदान केले. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीनेमहाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागास एकत्र आणले. स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय दृष्ट्या यशस्वी अशा सहकारी चळवळी आणि जातीय गणितातील प्रभुत्वाने काँग्रेस पक्षाचे शासनात वर्चस्व राहिले. राजकीय समीकरणात मराठासमाज व पश्चिम महाराष्ट्र सदैव अग्रणी राहिला. श्री. य. दि. फडके या इतिहासकारांनी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा काळाचा उद्बोधक आढावा घेतला आहे.
स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राचे योगदान : स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.
संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻