भारतीय संविधान दिन कार्यक्रम रूपरेषा
राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, आणि विद्यापीठांमध्ये, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षकांकडून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच विविध सरकारी कार्यालये, पोलिस मुख्यालय, पोलिस महासंचालनालय यांच्यापासून ते प्रत्येक पोलिस ठाण्यातही संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.
संविधान उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस :
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना
यांचे स्वातंत्र्य ; दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत.
भारतीय संविधान दिन, प्रास्ताविक आणि कार्यक्रमाची रूपरेषा :
भारताचे संविधान आणि आणि त्यातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, आणि विद्यापीठांमध्ये, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार असून विद्यार्थी, शिक्षकांकडून या दिनाचे औचित्य साधून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात येणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिन देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच विविध सरकारी कार्यालये, पोलिस मुख्यालय, पोलिस महासंचालनालय यांच्यापासून ते प्रत्येक पोलिस ठाण्यातही संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.
संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन :
भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारीत करणार आहेत. हीच तत्त्वे शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आणि त्यांना देशाचे जागरूक बनविणे आवश्यक आहे. संविधानातील तत्त्वांचा प्रसार व प्रचार करण्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरूवातीपासून संविधानाची पुरेशी ओळख व त्यातील तत्त्वांविषयी जागृती करून देण्यासाठी शिक्षण विभागाकडून हा दिवस शाळांमध्ये साजरा करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.
विविध कार्यक्रमांचे आयोजन :
संविधान दिनी संविधानाच्या प्रास्ताविकचे वाचन झाल्यानंतर प्रत्येक शाळांमधून संविधान यात्रा काढण्यात येणार आहेत. तर संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, स्लोगन, पोस्टर्स, समुहगान आदी स्पर्धांचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसोबत पोलिस, सर्वसामान्य नागरिकांनाही संविधानाची आणि त्यातील मौलिक तत्त्वाची माहिती होणे आवश्यक असल्याने राज्य सरकारकडून शाळांसोबत सरकारी कार्यालयातही हे कार्यक्रम साजरे करावेत असे आदेश देण्यात आले आहेत.
प्रास्ताविक वाचनामागील भूमिका :
◆ २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान अंगिकृत व अधिनियमित होऊन स्वत: प्रत अर्पित झाले.
◆ २६ नोव्हेंबर १९५० ला देश प्रजासत्ताक झाला.
◆ संविधानाचा खऱ्या अर्थी अंमल सुरू झाला.
◆ राष्ट्राची एकात्मता व बंधुता प्रवर्धित होणेसाठी संविधानाबाबत माहिती असणे आवश्यक.
◆ संविधान हे राष्ट्र निर्मितीचा, देशाच्या संपन्नतेचा व समृद्धीचा राष्ट्रग्रंथ आहे.
◆ हक्क व संरक्षणासोबतच नागरिकांचे कर्तव्य व जबाबदारी महत्त्वाची.
◆ संपूर्ण नागरिकांना संविधानाची ओळख होणे आवश्यक.
संविधानाचे वाचन कशासाठी ? :
◆ शालेय जीवनापासून- बालवयापासूनच मुला-मुलींना सविधांनाची माहिती होईल.
◆ शाळा, महाविद्यालयातून संविधान वाचनामुळे मुला-मुलींची मने सुसंस्कारित होतील.
◆ दररोजच्या वाचनामुळे प्रास्ताविकाचे पाठांतर होईल.
◆ प्रास्ताविकामधील शब्दांचा अर्थ हळूहळू समजू शकेल.
◆ मुला-मुलींच्या माध्यमातून संविधानाबाबत माहिती होईल.
◆ देशाचा-राज्याच्या संपूर्ण कारभार संविधानाच्या अंतर्गत चालतो.
◆ संविधान सन्मान म्हणजेच देश सन्मान राष्ट्रभक्ती आहे.
प्रास्ताविकेचे दररोज वाचन असे करावे :
◆ शाळा, महाविद्यालयांच्या भिंतीवर दर्शनी भागावर प्रास्ताविक लिहावे.
◆ प्रार्थना, परिपाठाचे वेळेस दररोज सर्वांनी वाचन करावे.
◆ प्रास्ताविक वाचनास अंदाजे दोन मिनिट लागतात.
◆ भिंतीवर लिहीण्याच्या अल्पशा खर्चात राष्ट्रीय बंधूभाव निर्मिती.
◆ कोणत्याही स्वतंत्र योजनेची व निधीची आवश्यकता नाही
संविधानाचे प्रास्ताविक काय सांगते :
◆ सार्वभौम भारत, समाजवादी भारत, धर्मनिरपेक्ष भारत.
◆ भारतातील लोकशाही गणराज्य.
◆ सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय.
◆ विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य.
◆ दर्जाची व संधीची समानता.
◆ सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता.
◆ एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार.
संविधानातील प्रमुख अंगे :
◆ संसदीय लोकशाही
◆ संघराज्यीय पद्धत
◆ मुलभूत हक्क व त्यासाठी न्यायालयीन यंत्रणा
◆ मार्गदर्शक तत्त्वे
◆ केंद्र राज्य संबंध
◆ घटना दुरुस्ती
संविधानातील महत्त्वाचा तपशील :
◆ भारतीय संविधानात ३९५ अनुच्छेद आहेत.
◆ मुळात आठ परिशिष्टे, आज स्थितीत बारा परिशिष्टे.
◆ ब्रिटीश राजवटीतील हितसंबंधी गटांना संरक्षणाचे आश्वासन घ्यावे लागल्यामुळे संविधान तपशीलयुक्त लिहिले गेले.
◆ आयसीएस अधिकारी, अग्लोइंडियन संस्थानिक, सरकारी सनदी नोकर या सर्वाबाबतबच्या तरतुदींचा समावेश.
◆ अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती, जमाती बाबत तरतुदी समाविष्ट.
नागरिकांनाही संविधानाची माहिती द्यावी :
शाळांमध्ये संविधानातील अधिकार, कर्तव्य आदी विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने, व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, शाळांमध्ये आणि गावांमध्ये संविधान सभा भरवून विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाही संविधानाबाबत माहिती होईल असे कार्यक्रम आयोजित करावेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
संविधानाने दिलेले अधिकार :
धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविणाचा व सर्व नागरिकांस समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण देणारे भारतीय संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अंगिकृत आणि अधिनियमित करून देशाला अर्पण करण्यात आले होते. या दिवसाची आणि एकुणच संविधानाने दिलेल्या अधिकार, कर्तव्ये, संवैधानिक हक्क आदीची माहिती व्हावी.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/