शाळेचा निरोप घेतांना...!!
Our ways may change
but not our hearts,
Our life may lend us apart,
but our memories will...
link us together,
link us together !!
हीच विचारधारा मनात रूजवत, सर्व गुरूजनांना सादर प्रणाम करून, हायस्कूलच्या या वटवृक्षाच्या सावलीस आलेला एक छोटासा पक्षी आज निरोप देण्यास उभा आहे. आता इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था ही सासरी जाणाऱ्या नववधूप्रमाणे झालेली आहे. प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी मने मात्र, जुन्या स्मृतींना जागे करण्यात गुंग झालेली आहेत. खरंच ! किती अविस्मरणीय होता हा प्रवास ! शाळेत पाचव्या इयत्तेत माझ्यासारख्या मातीच्या गोळयाचे आगमन झाले. या मातीच्या गोळयाला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपी दिव्यात तावून सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी ! पाचवीपासून जशी माझी शारिरीक उंची वाढली तशी मानसिक उंचीही वाढली. माझ्या गुरूजनांनी फक्त अभ्यासातील विषयांशीच माझी मैत्री जमवली नाही तर, जगात कसे वागायचे, हे देखील शिकवले. अवघ्या सहा वर्षात या सुरवंटांचे रूपांतर फुलपाखरात झाले.
सुरवंटांचे झाले पाखरू,
सर्वत्र लागले भराऱ्या मारू.
नवे जग, नव आशा, शोध,
घेण्याची जबर मनिषा.
याच शाळेने लावले वळण,
त्यांवर चढू यशाची चढण ॥
हे वळण लावण्यासाठी, गुरूजनांनी अविरत कष्ट घेतले. शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्कृतीचा लेप दिला. मनाच्या कोया करकरीत पाटीवर समतेचे, ममतेचे धडे गिरविले. आणि आज ती पाटी ज्ञानरत्नांनी शिगोशिग भरलेली आहे. शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज..! म्हणूनच, आमच्या जीवनाचा कटीपतंग न होण्यासाठी त्याने प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला. हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोलले नाही. प्रत्येक दगडातील देव शोधून त्यांवर सद्विचारांचे घाव घातले. आणि त्या दगडाला ज्याच्या, त्याच्या गुणवैशिष्टयाप्रमाणे देवाचे रूप दिले. उदाहरणच द्यायचं झालं तर नटराजाच्या मुर्तीलाही आकार मिळाला. शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांचीच रास निर्माण केली नाही, तर उत्कृष्ट कलाकार व उत्तमोत्तम खेळाडूही निर्माण केले.
माझ्या मनात आज रूंजी घालत आहेत ती शाळेतील व्याख्याने, नाटयवाचने, एकांकिका बसवणे, प्रदर्शनाचे तक्ते, वक्तृत्व स्पर्धा ते सत्कार. इतकेच काय, माझ्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणारे माझे गुरूजन. ते जिंकणे... ते हरणे ..! व्यक्तीमत्वाला पैलू पडले ते इथेच. कांहीस घडण... कांहीस बिघडणं आणि सर्वांत शेवटी तथास्तु म्हणून दिलेला आदर्श विद्यार्थीनीरूपी आशिर्वाद !
शिक्षक दिनी मुख्याध्यापिका होताना अवघ्या तीन-साडे तीन तासात शिक्षकांचे कष्ट, त्यांचे प्रयत्न लक्षात आले आणि म्हणूनच ठरवलं की सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची आजची ही संधी ! नव्या क्षितिजांना साद घालताना जुन्या क्षितीजांना अभिवादन करणे, त्यांचे आशिर्वाद घेणे हीच आपली संस्कृती. म्हणूनच, या संस्कृतीचा पाईक असणारी मी ही काटयांप्रमाणे बोचणारी स्मृतीची फुले मनात साठवत शालेय विद्यार्थीनी म्हणून या स्टेजवरचे शेवटचे भाषण देताना माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शतशः अभिवादन करते आणि स्पष्ट करते कीं, या मंदिरात उभारलेल्या पायावर माझी उत्तम माणुसरूपी इमारत नक्कीच उभी राहील आणि माझ्या यशाचा, सत्कार्याचा सुगंध सदैव या शाळेला प्रफुल्लीत करेल.
शेवटाला एवढेच म्हणेन...
बालपणीचे दिवस सुखाचे,
आठवती घडी घडी
आठवणींना आठवणींची,
वाहतो ही शब्दसुमनांची जुडी.
बालपणीचे सखे सोबती,
आठवणींना अजुन झोंबती.
कांही गुरूजन कांही सवंगडी,
या सर्वांनी विविध गुणांनी
जशी घडवली तशीच घडली,
आयुष्याची घडी.
आणि म्हणूनच, वाहिली
ही शब्दसुमनांची जुडी...!!
!! धन्यवाद !!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉