शिष्याची परीक्षा .
रामानुजाचार्य
शठकोपस्वामींचे शिष्य होते. स्वामींनी रामानुजांना ईश्वरप्राप्तीचे रहस्य सांगितले
होते. मात्र ते कुणालाही सांगू नको, असे बजावले होते; पण रामानुजांनी आपल्या गुरूंची
ही आज्ञा मानली नाही. गुरूंनी जे ज्ञान दिले, ईश्वरप्राप्तीचा जो मार्ग सांगितला होता,
ते सारे ज्ञान त्यांनी लोकांना देण्यास प्रारंभ केला. शठकोपस्वामींना हे जेव्हा कळले,
तेव्हा ते फार संतापले. रामानुजांना बोलावून घेऊन ते म्हणाले, ‘‘माझी आज्ञा मोडून तू
साधनेचे रहस्य प्रगट करत आहेस. हा अधर्म आहे. पाप आहे. याचा परिणाम काय होईल तुला ठाऊक
आहे का ?’’
रामानुज नम्रपणे म्हणाले,
‘‘गुरुदेव, गुरूंची आज्ञा मोडल्यास शिष्याला नरकात जावे लागते.’’ शठकोपस्वामींनी
विचारले, ‘‘हे तुला ठाऊक असतांनासुद्धा तू जाणूनबुजून असे का केलेस ?’’
यावर रामानुज म्हणाले, ‘‘वृक्ष
आपले सारे काही लोकांना देतो. त्याला कधी स्वार्थ आठवतो का ? मी जे काही केले,
त्यामागचा उद्देश लोकांचे कल्याण व्हावे, लोकांनासुद्धा ईश्वरप्राप्तीचा आनंद
मिळावा, असाच आहे. यासाठी मला नरकात जावे लागले, तर मला त्याचे मुळीच दुःख होणार
नाही.’’
ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना
सांगण्याची रामानुजांची तळमळ पाहून स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी रामानुजांना
पोटाशी धरले. त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि लोकांत खर्या ज्ञानाचा प्रचार
करण्यासाठी मोठ्या प्रेमाने पाठवले.
मुलांनो, रामानुजांनी ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगितली. त्यांच्या तळमळीने स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले. आपणही आपल्याला मिळालेले ज्ञान असेच वाटले पाहिजे.
रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद .
स्वामी
विवेकानंदांनी जगदम्बेकडे केवळ ‘ज्ञान, भक्ति आणि वैराग्य’ मागितले होते. हे कसे
घडले, याचा उलगडा करताना स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘संसारातील शेकडो विचारांनी
माझ्या मनात ठाण मांडले होते. पूर्वीप्रमाणे पैसा मिळविण्यासाठी घरातून बाहेर पडलो
आणि अनेक प्रयत्न करीत इकडेतिकडे फिरू लागलो. एका अटर्नीच्या ऑफिसात थोडेबहुत काम
करून आणि काही पुस्तकांचा अनुवाद करून थोडे धन मिळवले आणि कसेबसे दिवस लोटू लागले;
पण कायमचे असे काम मिळाले नाही. त्यामुळे आईच्या आणि भावांच्या पोषणाची पक्की
व्यवस्था झाली नाही. काही दिवसांनंतर मनात विचार आला की ईश्वर ठाकुरांचे (
रामकृष्ण परमहंस ) सांगणे ऐकतो, म्हणून त्यांना विनंती करून आईला व भावांना
अन्न-वस्त्राच्या अभावामुळे होणारे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्याकडून प्रार्थना
करवून घेईन. माझ्यासाठी अशी प्रार्थना करण्यास ते कधीही नाकबूल होणार नाहीत. असा
विचार करून मी घाईने दक्षिणेश्वरी पोहोचलो आणि ठाकुरांना आग्रहाने वारंवार सांगू
लागलो, ‘आईचे व भावाचे आर्थिक कष्ट दूर करण्यासाठी आपण जगन्मातेला प्रार्थना केलीच
पाहिजे.’ ठाकूर उत्तरले, ‘बाबारे, आईला मी अशा गोष्टी सांगू शकत नाही. तू स्वतः
आईला ही गोष्ट का सांगत नाहीस? तू आईला मानीत नाहीस, म्हणून तू इतके कष्ट भोगीत
आहेस.’ मी म्हटले, ‘मी तर आईला जाणत नाही; आपणच माझ्यासाठी तिला सांगा- आपण
सांगितलेच पाहिजे; तसे केल्यावाचून मी आपणास मुळीच सोडणार नाही.’ प्रेमाने ठाकूर
उत्तरले, ‘अरे, कितीतरी वेळा मी म्हटले आहे की आई, नरेन्द्राचे दुःखकष्ट दूर कर;
तू तिला मानीत नाहीस, म्हणून तर आई ऐकत नाही. बरे, आज मंगळवार आहे; मी सांगतो, आज
रात्री कालीमंदिरात जाऊन आईला प्रणाम करून तू जे मागशील ते आई तुला देईल. माझी आई
चिन्मयी ब्रह्मशक्ती आहे. तिने आपल्या इच्छेने या जगाला जन्म दिला आहे. तिची इच्छा
असल्यास ती काय करू शकणार नाही?’
‘माझा दृढ
विश्वास बसला की ज्या अर्थी ठाकुरांनी तसे म्हटले आहे त्या अर्थी प्रार्थना करताच निश्चितच
सर्व दुःख दूर होईल. अत्यंत उत्कंठेने रात्रीची वाट पाहू लागलो. हळूहळू रात्र झाली.
एक प्रहर उलटल्यानंतर ठाकुरांनी मला कालीमंदिरात जाण्यास सांगितले. मंदिरात जाता जाता
एक प्रकारच्या गाढ नशेने माझ्यावर अंमल बसविला, पाय लटपटू लागले आणि आईला मी खरोखरच
पाहू शकेन व तिच्या मुखातून शब्द ऐकू शकेन असा प्रकारच्या स्थिर विश्वासामुळे इतर सर्व
विषयांचा विसर पडून मन अत्यंत एकाग्र व तन्मय झाले आणि त्याच गोष्टीचा विचार करू लागले.
मंदिरात उपस्थित झाल्यावर बघितले की आई खरोखरीच चिन्मयी आहे, खरोखरच ती जिवंत आहे आणि
अनंत प्रेमाचे व सौंदर्याचे ती उत्पत्तिस्थान आहे. भक्तीने व प्रेमाने हृदय उचंबळू
लागले; विव्हल होऊन वारंवार प्रणाम करीत म्हणून लागलो, ‘आई मला विवेक दे, वैराग्य दे,
ज्ञान दे, भक्ति दे असे करून दे की मला तुझे नेहमी अबाधित दर्शन लाभेल.’ हृदय शांतीने
भरून गेले. सर्व जग पूर्णपणे अदृश्य होऊन एकमात्र आईच हृदय व्यापून उरली.
‘ठाकुरांजवळ
परत पोहोचताच त्यांनी विचारले, ‘काय रे, संसारातील उणीवा दूर करण्यासाठी तू आईला प्रार्थना
केलीस ना?’ त्यांच्या प्रश्नाने चकित होऊन मी म्हटले, ‘नाही महाराज, विसरून गेलो. आता
मी काय करू?’ ते म्हणाले, ‘जा, जा, पुनः जा, आणि प्रार्थना कर.’ फिरून मी मंदिरात गेलो.
आईसमोर उपस्थित झाल्यावर पुनः मुग्ध होऊन सर्वकाही विसरून गेलो व पुनःपुन्हा प्रणाम
करीत ज्ञान-भक्ति-लाभासाठी प्रार्थना करून परत फिरलो. हसत हसत ठाकूर म्हणाले, ‘काय
रे, यावेळी तू सांगितलेस ना?’ पुनः चकित होऊन म्हटले, ‘नाही महाराज, आईला पाहताच एका
दैवी शक्तीच्या प्रभावामुळे सर्व गोष्टी विसरून जाऊन केवळ ज्ञान-भक्तिलाभाविषयीच सांगितले.
आता काय होईल?’ ठाकूर म्हणाले, ‘ वा रे पोरा, स्वतःला थोडे सावरून ही प्रार्थना करू
शकला नाहीस ना! शक्य असेल तर पुनः एकदा जाऊन या गोष्टी सांगून ये. जा, लवकर जा.’ फिरून
मंदिरात गेलो; मंदिरात प्रवेश करताच घोर लज्जेने माझे हृदय भरून गेले. विचार करू लागलो
की ही असली क्षुद्र गोष्ट आईला सांगण्यासाठी आलो आहे. हा तर ठाकूर म्हणत त्याप्रमाणे
‘राजाला प्रसन्न करून घेतल्यावर त्याला भोपळा मागण्यासारखा निर्बुद्धपणा झाला! माझी
बुद्धी इतकी का हीन झाली आहे! लज्जेने व घृणेने भरून जाऊन आईला पुनःपुन्हा प्रणाम करून
म्हणू लागलो, ‘ आई मला दुसरे काही नको, केवळ ज्ञानभक्ती दे.’ मंदिराबाहेर आल्यावर मनात
विचार आला की ही निश्चितच ठाकुरांची लीला आहे. नाहीतर तीनतीनदा आईकडे गेल्यावरही काही
सांगता आले नाही. त्यानंतर ठाकुरांना मी आग्रहपूर्वक म्हणू लागलो की निश्चित आपणच अशी
भुरळ पाडली, आता आपल्यालाच सांगावे लागेल की माझ्या आईला व भावांना अन्नवस्त्राची ददात
उरणार नाही. ते उत्तरले, ‘अरे, तशी प्रार्थना मी कुणासाठीदेखील कधीच करू शकलो नाही,
माझ्या मुखातून तशी प्रार्थना बाहेर पडताच नाही. तुला मी सांगितले की आईला जे तू मागशील
तेच तुला मिळेल. तू मागू शकला नाहीस, तुज्या नशिबी संसारातील सुख नाही, त्याला मी काय
करू?’ मी म्हटले, ‘महाराज, ते काही चालणार नाही. माझ्यासाठी आपण ही गोष्ट सांगितलीच
पाहिजे; माझा पक्का विश्वास आहे की आपण म्हटल्यास माझ्या आईचे व भावाचे दुःख उरणार
नाही. याप्रमाणे जेव्हा मी सारखा त्यांच्यामागे लागलो तेव्हा ते म्हणाले, ‘बरे जा,
त्यांना जाड्याभरड्या अन्नवस्त्राची कधीच उणीव भासणार नाही.’
तात्पर्य : चित्तशुद्धी झालेला उपासक मागणे मागणार ते परमार्थाचेच ! लोककल्याणाचेच ! स्वार्थाचा लवलेशही मागण्यात नसणार. अशा उपासकाच्या इच्छापूर्तीतून जगाचे भलेच होणार !
गुरू आज्ञेपुढे स्वत:ला झोकून देणारा शिष्य अरुणी
पूर्वी धौम्य नावाच्या मुनींचा एक आश्रम
होता. तेथे त्यांचे पुष्कळ शिष्य विद्याभ्यासासाठी रहात. त्यात अरुणी नावाचा एक शिष्य
होता. एकदा जोराचा पाऊस पडू लागला. जवळील ओढ्याचे पाणी शेतात जाऊ नये; म्हणून तेथे
एक बांध घातला होता. त्या बांधालाही पाण्याच्या जोराने भेगा पडू लागल्या. तेव्हा गुरुदेवांनी
काही शिष्यांना सांगितले, ”पाणी शेतात येऊ देऊ नका आणि पाणी आडवा.”
अरुणी आणि काही शिष्य बांधाजवळ आले. बांधाला
पडलेल्या भेगा मिटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले; पण पाण्याचा जोर जास्त असल्याने
सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. बांधाचा मधला थोडासा
भाग फुटू लागला आणि पाणी हळूहळू शेतात येऊ लागले. तेव्हा रात्र झालेली होती. आता काही
उपयोग नाही; म्हणून सर्व शिष्य परत आले. दिवसभर कष्ट केल्यामुळे दमलेले सर्व जण गाढ
झोपी गेले. सकाळपर्यंत पाऊस थांबला. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले. अरुणी कोठेही नाही.
सगळया आश्रमात शोधून शेवटी ते गुरुदेवांकडे गेले आणि म्हणाले, ”गुरुदेव, अरुणी हरवला.”
गुरुदेव म्हणाले, ”आपण शेतात जाऊन बघूया.” सर्व शिष्य आणि धौम्यऋषी शेतात जातात. पहातात
तर काय ? फुटलेल्या बांधाच्या मध्ये पाणी अडवण्यासाठी स्वत: अरुणीच तेथे आडवा झोपलेला
त्यांना दिसला. हे पाहून सर्व जण थक्क झाले. रात्रभर पावसात न जेवता झोपलेल्या अरुणीविषयी
सर्वांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झाले. पाणी तर केव्हाच ओसरलेले होते; पण अरुणीला
तेथे झोप लागलेली होती. सर्वांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला उठवले. गुरुदेवांनी त्याला
जवळ घेऊन प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हे पाहून सर्व शिष्यांच्या डोळयांत
पाणी आले.
मुलांनो , अरुणीकडून आपण काय शिकायचे ? तर
गुरूंचे आज्ञापालन करण्याची तीव्र तळमळ. गुरूंचे आज्ञापालन करण्यासाठी अरुणीने स्वत:चा
विचार केला नाही; म्हणूनच तो गुरूंचा आवडता शिष्य बनला. यासाठी आपणही आपल्या गुरूंच्या
चरणी प्रार्थना करूया, ‘हे गुरुदेवा, आमच्यामध्येही शिष्याचा ‘आज्ञापालन’ हा गुण निर्माण
होऊ दे.’
संकलन : गिरीष दारुंटे , मनमाड-नाशिक
--------------------------------
--------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
--------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻