बहीण भाऊ
एक अनोखं नातं
बहीण-भाऊ एक अनोखं नातं
भाऊबीज हा प्रत्येक बहीणीसाठी वर्षातला सगळ्यात मोठा सण असतो. भाऊ जेवायला येणार म्हणजे काय लहानसहान गोष्ट आहे ? ती आदल्या दिवशीपासून खपून त्याच्या आवडीचा मेनू करणार. अगदी आई करायची व तो तुटून पडायचा तसा. नवऱ्याने व मुलांनी त्या दिवशी मध्ये लुडबुडायचं नाही. एक दिवस एकट्या भावाचा. तो रक्षाबंधनाला येऊ शकला नाही तर त्याच्या बचावार्थ झाशीच्या राणीच्या आवेशात हीच पुढे सरसावणार.
मी असंख्य उदाहरणे पाहिलीत व 'वेड्या बहिणीची वेडी ही माया' पाहून थक्क झालोय. पोटची पोरगी असली की आईला मुलाची काळजी नसते. तिच्या पदरात मुलाला टाकून ती निर्धास्त होते. बहीण स्वत:ची व आईची अशा दोन्ही भूमिका निभावत असते. वडील असू देत, भाऊ असू देत, काका-मामा असू देत, मावश्या-आत्या असू देत; पण बहीण ती बहीण. हे सगळे मिळून एका रक्ताच्या बहिणीची जागा घेऊ शकत नाहीत.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. 'माझा भाऊ' अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं.
भावाची काळजी करणे, त्याच्यासाठी नवस व उपासतापास करणे, त्याच्या यशाने हरखून जाणे हे सगळे ती कोणी सांगायची वाट न पाहता स्वप्रेरणेने, मनापासून करीत असते.
निसर्गाचा नियम आहे... सारी दुनिया एक तरफ और जोरू का भाई एक तरफ। हे काही उगाच नाही.
म्हणूनच आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण...!!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक