आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे. कारण आज आपण साजरा करीत आहोत, भारताचे महान तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, विद्वान आणि भारताचे
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती अर्थातच ह्या दिवसाचे दुसरे महत्व म्हणजेच शिक्षक दिन !
शिक्षक हा केवळ शिकवणारा व्यक्ती नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा मार्गदर्शक असतो. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि अपयशातून यशाकडे नेणारा खरा दीपस्तंभ म्हणजे शिक्षक !
आजच्या या मंगलमय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि शिक्षकांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो / करते.
शिक्षक दिन सूत्रसंचालन 1

अध्यक्षीय निवड :
ज्या आदरणीय व्यक्तींच्या विचारांनी कार्यक्रमाला दिशा व श्रोत्यांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, ज्या व्यक्तीच्या उपस्थितीने कार्याक्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होते, अशा मान्यवर व्यक्तीचे अध्यक्षपद कार्यक्रमासाठी निश्चितच भूषणावह असते.
आजच्या शिक्षक दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी अध्यक्षपदाची धुरा सोपवितांना शिक्षण क्षेत्राविषयी आस्था, विद्यार्थ्यांविषयी आपुलकी, शिक्षकांविषयी आदर आणि सामाजिक कार्याची जाण असलेल्या मा. यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.
(सहकारी शिक्षक / शिक्षिकेने विनंतीस अनुमोदन द्यावे)
तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले व त्यांचा बहुमूल्य वेळ खर्च करून आपल्या विनंतीस मान देऊन आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले सन्मानीय श्री. / सौ. ____ यांचेही मी या ठिकाणी स्नेहपूर्वक स्वागत करतो / करते.
दीपप्रज्वलन / प्रतिमा पूजन :
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण दीपप्रज्वलन करून करत असतो.
"तमसो मा ज्योतिर्गमय" अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा, अशी भारतीय संस्कृतीची प्रार्थना आहे.
ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या जीवनात सदैव राहावा, या मंगल भावनेने आता आपण दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पाडणार आहोत.
दीपप्रज्वलनासोबतच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण ज्ञान, प्रेरणा व संस्काराचे प्रतिक असणाऱ्या महान व्यक्तींच्या स्मरणाने करत असतो. त्यांच्या विचारांमधून आपल्याला कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यांच्या आदर्शामधून जीवनाला योग्य दिशा मिळते.
आज आपण ज्या महान व्यक्तींचे स्मरण करत आहोत. त्यांच्या विचारांना अभिवादन करणे म्हणजे केवळ प्रतिमेला पुष्प अर्पण करणे नव्हे, तर त्यांच्या आदर्शाचा आपल्या जीवनात स्वीकार करण्याचा संकल्प करणे होय.
मी विनंती करतो / करते की, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ____ , प्रमुख पाहुणे ____, शाळेचे मुख्याध्यापक ____ तसेच उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन व प्रतिमापुजनासाठी व्यासपीठावर यावे.
ज्ञानाचा दीप तेवत राहो,
विद्येचा प्रकाश पसरत राहो,
प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात,
यशाची पहाट उगवत राहो!
दीपप्रज्वलन झाल्यावर प्रतिमा पूजन करण्यात येत आहे.
ज्याच्या कृपेने ज्ञान मिळते,
ज्याच्या आशीर्वादाने बुद्धीला तेज प्राप्त होते,
त्या महान व्यक्तींच्या चरणी नतमस्तक होऊन
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
शिक्षक दिन सूत्रसंचालन 2

मान्यवरांचे स्वागत :
भारतीय संस्कृतीमध्ये पाहुण्यांचे स्वागत करणे ही आपली गौरवशाली परंपरा आहे.
दीप प्रज्वलन व प्रतीमा पुजनानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या मान्यवरांचे स्वागत आपल्या विद्यालयातील विद्यार्थी स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वागत करतील.
त्यांना आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन देऊया.
(स्वागत गीतानंतर)
खूप सुंदर आणि मनमोहक सादरीकरण !!
सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
( व्यासपिठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा. )
अध्यक्ष : श्री / सौ. ____ प्रमुख पाहुणे : श्री. / सौ. ____
अतिथींच्या आगमनाने झाले
वातावरण प्रसन्न उल्हासित
करुनी उपकृत आम्हा
स्विकारावे आमुचे स्वागत
- गिरीष दारुंटे
( पुस्तक स्वरूपात / झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरुपात स्वागतनियोजन करून ठेवावे. )
अतिथी देवो भव... ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे.
आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय श्री. सौ. ____ हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. मी विनंती करतो / करते की ____ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे.
इतर मान्यवरांचेही आपल्या विद्यालयात मनःपूर्वक स्वागत !!
आपल्या उपस्थितीने आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे. त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचे आपल्या उपस्थितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!
प्रास्ताविक :
सुख दुःखाच्या छायेतून कळते
जसे सार अवघ्या जीवनाचे
आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते
तसे हे महत्व प्रास्ताविकाचे
- गिरीश दारुंटे
आजच्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेचे श्री. / सौ. ____ करतील.
सन्माननीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो...
आपण दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस भारताचे महान शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षण आणि शिक्षकांवर विशेष प्रेम होते. त्यांच्या मते शिक्षक हा समाज घडविणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर जीवन जगण्याचे धडे देतात. आई-वडील आपल्याला जन्म देतात; परंतु शिक्षक आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. म्हणूनच आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे. कारण आज आपण येथे एकत्र आलो आहोत, त्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यासाठी, ज्यांनी आपल्या हातात पुस्तक दिले, मनात ज्ञानाची ज्योत पेटवली, डोळ्यांत स्वप्ने निर्माण केली आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी योग्य दिशा दाखवली.
शिक्षक दिन सूत्रसंचालन 1

आजचा दिवस आहे.... शिक्षक दिन !!
शिक्षक... हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ते एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व, हातात खडू किंवा पेन, चेहऱ्यावर विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी आणि मनात प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यात यशस्वी व्हावे ही एकच इच्छा!
शिक्षक म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक शिकवणारी व्यक्ती नाही...
शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीप आहे.
शिक्षक म्हणजे संस्कारांचा झरा आहे.
शिक्षक म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा शिल्पकार आहे.
शिक्षक म्हणजे अडचणींच्या वाटेवरचा मार्गदर्शक आहे.
शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याच्या स्वप्नांना पंख देणारा प्रेरणास्रोत आहे.
आई-वडील आपल्याला जन्म देतात; पण आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे महान कार्य शिक्षक करतात. पालक आपल्याला जगात आणतात, तर शिक्षक आपल्याला या जगात कसे जगावे, कसे वागावे आणि समाजासाठी कसे उपयुक्त ठरावे, हे शिकवतात. म्हणूनच आपल्या जीवनात शिक्षकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
विद्यार्थीमित्रांनो,
आपण दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस भारताचे महान तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. ते स्वतः एक आदर्श शिक्षक आणि प्रख्यात तत्त्वज्ञ होते. त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि सहकाऱ्यांना त्यांच्याबद्दल अत्यंत आदर होता. जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अधिक आनंद होईल, अशी भावना व्यक्त केली. यातूनच ५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची सुंदर परंपरा सुरू झाली. हा दिवस केवळ शिक्षकांना शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, तर शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
एखाद्या विद्यार्थ्याच्या हातात पुस्तक देणे सोपे आहे; परंतु त्या पुस्तकातून ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा निर्माण करणे हे शिक्षकांचे काम आहे. विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले गुण मिळवून देणे हे शिक्षकांचे एक कार्य आहे; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याला जीवनाच्या परीक्षेसाठी तयार करणे हे शिक्षकांचे खरे कार्य आहे.
शिक्षक विद्यार्थ्याला सांगतात...
चुकलात तर घाबरू नका,
पुन्हा प्रयत्न करा.
अपयश आले तर थांबू नका,
त्यातून शिकून पुढे चला.
यश मिळाले तर गर्व करू नका,
आणि इतरांना मदतीचा हात द्या.
हीच तर खरी शिक्षणाची शिकवण आहे.
एखादा दगड शिल्पकाराच्या हातात गेल्यानंतर त्याला सुंदर मूर्तीचे रूप प्राप्त होते. त्याचप्रमाणे एक विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घडत जातो. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना ओळखणे, त्यांच्या क्षमता विकसित करणे, त्यांच्या चुका सुधारून त्यांना योग्य मार्ग दाखवणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हे शिक्षकांचे महान कार्य आहे. म्हणूनच शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शिल्पकार आहे. आज आपण डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ, अधिकारी, कलाकार, खेळाडू, उद्योजक आणि समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती पाहतो. या सर्वांच्या यशाच्या पायाभरणीत कुठेतरी एका शिक्षकाचा हात असतो.
आजच्या या विशेष दिवशी आपण आपल्या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया.
आपल्या शिक्षकांनी आपल्याला केवळ अक्षरे आणि आकडे शिकवले नाहीत, तर...
शिस्त शिकवली,
वेळेचे महत्त्व सांगितले,
स्वच्छतेची सवय लावली,
प्रामाणिकपणा शिकवला,
परिश्रमाचे महत्त्व पटवून दिले,
अपयशाला सामोरे जाण्याचे धैर्य दिले
आणि स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली.
शिक्षक दिन सूत्रसंचालन 2

आपण एखाद्या दिवशी यशस्वी झालो, आपल्या कर्तृत्वाने आपल्या शाळेचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल केले, तर त्या यशात आपल्या शिक्षकांचाही मोठा वाटा असेल. म्हणूनच म्हणावेसे वाटते...
गुरुंच्या ऋणाची परतफेड
शब्दांनी कधीच होत नाही;
त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगणे
याहून मोठी गुरुदक्षिणा नाही.
शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित नसते. शिक्षक विद्यार्थ्यांच्या यशात आनंदी होतात आणि त्यांच्या अडचणींमध्ये मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्याने केलेली छोटीशी प्रगतीही शिक्षकांसाठी मोठ्या आनंदाची गोष्ट असते. कधी शिक्षक विद्यार्थ्याला कौतुकाची थाप देतात, तर कधी त्याच्या चुकीसाठी त्याला समज देतात. त्या समजेमागे राग नसतो; तर विद्यार्थ्याने योग्य मार्गावर चालावे, ही काळजी असते. म्हणूनच शिक्षकांनी दिलेली शिस्त, सूचना आणि मार्गदर्शन यांचा आपण सकारात्मक स्वीकार केला पाहिजे.
आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण एक छोटासा संकल्प करूया कि...
आम्ही आमच्या शिक्षकांचा सदैव आदर करू, त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करू, मन लावून अभ्यास करू, शिस्तीचे पालन करू, चांगले संस्कार आत्मसात करू आणि एक जबाबदार, संवेदनशील आणि आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करू.
हा संकल्पच आपल्या शिक्षकांसाठी आजच्या शिक्षक दिनी खरी भेट ठरेल.
आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल सर्व मान्यवरांचे, पालकांचे मी पुनश्च एकदा आभार मानतो व माझ्या प्र्स्ताविकास पूर्णविराम देतो.
शिक्षक दिन सूत्रसंचालन 1

सांस्कृतिक कार्यक्रम :
विद्यार्थी मित्रांनो आता आपण कार्यक्रमाच्या तुमच्या आवडत्या टप्प्याकडे वळत आहोत.
शिक्षक दिन केवळ भाषणांचा कार्यक्रम नसून शिक्षकांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्या शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांनी विविध कविता सादरीकरण, गीत सादरीकरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी केली आहे.
तर त्या सर्व विद्यार्थ्यांना टाळ्यांच्या कडकडाटात सादरीकरणासाठी शुभेच्छा देऊयात तसेच अनुक्रमे एकेक विद्यार्थ्यांचे स्वागत करूया !!
शिक्षकांचा सत्कार :
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर,
गुरु म्हणजे संस्कारांचा आधार,
गुरु म्हणजे जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ !!
आजच्या या विशेष दिवशी आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. शिक्षकांनी दिलेले ज्ञान, संस्कार, शिस्त, प्रेम आणि मार्गदर्शन यांची परतफेड कोणत्याही भेटवस्तूने होऊ शकत नाही. तरीही आपल्या मनातील आदर व्यक्त करण्यासाठी हा छोटासा सत्कार...
शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांचा योग्य व्यक्तींच्या हस्ते सत्कार करण्यात यावा.
______________________________________________
आपल्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
विद्यार्थी भाषणे व शिक्षकांचे मनोगत :
____________
अध्यक्षीय मनोगत :
आता आपण कार्यक्रमाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. कोणत्याही कार्यक्रमाला अध्यक्षीय मनोगतामुळे विचारांची दिशा आणि समारोपाला परिपूर्णता प्राप्त होते.
आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ____ यांनी आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थिती दिली आहे. त्यांचे मार्गदर्शन म्हणजे आपल्यासाठी प्रेरणेचा अमूल्य ठेवा आहे.
मी त्यांना विनम्र विनंती करतो / करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे.
अध्यक्षीय मनोगत झाल्यावर
मा. अध्यक्ष महोदय / महोदया, आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!
आभारप्रदर्शन :
कृतज्ञता ही अशी भावना आहे,
जी व्यक्त केली की नाती अधिक घट्ट होतात.
आजचा हा सुंदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.
विशेषतः आपल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या शिक्षकांनी आम्हाला दिलेले ज्ञान आणि संस्कार आम्ही आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करू.
थेंबाथेंबाने तलाव भरतो,
हाताहाताने कार्यक्रम फुलतो.
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार,
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचेही आभार !!
समारोप :
विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला एक सुंदर संदेश देऊन जातो...
"शिक्षकांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसावा;
शिक्षकांप्रती आदर आपल्या आचरणातून वर्षभर दिसला पाहिजे."
शिक्षकांनी शिकवलेले प्रत्येक चांगले मूल्य आपल्या जीवनात उतरवणे, प्रामाणिकपणे अभ्यास करणे, शिस्त पाळणे, मोठ्यांचा आदर करणे आणि चांगला नागरिक बनणे हीच शिक्षकांसाठी खरी गुरुदक्षिणा आहे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते...
गुरु असतो म्हणून ज्ञान मिळते,
ज्ञान मिळते म्हणून व्यक्तिमत्त्व घडते,
व्यक्तिमत्त्व घडते म्हणून समाज घडतो,
आणि समाज घडतो म्हणून राष्ट्र प्रगत होते.
अशा या महान कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना मनःपूर्वक प्रणाम !!
सर्व आदरणीय शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार!
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने
आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता समारोपाची वेळ आली.
आजच्या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम / राष्ट्रगीताने होईल.
अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या कार्यक्रमाची येथे सांगता झाली असे मी जाहीर करतो / करते.
!! जय हिंद - जय महाराष्ट्र !!
!! धन्यवाद !!
शिक्षक दिन सूत्रसंचालन 1

शिक्षक दिन सूत्रसंचालन 2

शब्दांकन / संकलन / निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड
Copyright Disclaimer
वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.
ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
