विज्ञान म्हणजे काय | राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण | विज्ञान दिन माहिती | Nationa Science Day | What Is Science ?

निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली, पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती (Knowledge ascertained by observations, critically tested, systematized & brought under general principles). वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे, तर्कसुंसगत कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागतं. आपल्याला ज्याचं कारण चटकन सांगता येत नाही, ती गोष्ट दैवी किंवा अतिमानवी मानणं चुकीचं आहे. निरीक्षण करून, उपलब्ध ज्ञान वापरून, तर्कानं त्या घटनेमागचं कारण शोधायला हवं, ते योग्य आहे की नाही हे पडताळण्यासाठी पुरावे मिळवायला हवेत, आणि ते पुरावेही तपासून बघायला हवेत. 'पुरावा तेवढा विश्वास' या पद्धतीनं विचार केला, तर जगात चमत्कार शिल्लकच उरत नाहीत. उरतात ती, कदाचित सोडवायला कठीण, अशी कोडी! एखादी घटना त्याच पद्धतीनं का घडते हे शोधून काढण्याची, सत्यशोधनाची वृत्ती म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची की वैज्ञानिक विचार पद्धत!

विज्ञानाची सुरवात झाली आग पेटवून ती टिकवण्याच्या शोधातून.

कोरडी पडलेली दोन झाडाची खोडं पडताना एकमेकावर घासली गेली आणि त्यातून जाळ पेटला हे एकंदर निरीक्षण. घर्षणामुळे आग पेटली असावी हा तर्क. दोन कोरडया कठीण वस्तू एकमेकांवर जोरात घासल्या गेल्या तर ठिणगी पडू शकते, हे प्रत्यक्ष प्रयोगानंतरचं अनुमान. वेगवेगळ्या परिस्थितीत पुन्हा प्रयोग. यातून पाहिजे तेव्हा आग निर्माण करण्याची आणि इंधन घालून ती टिकवण्याची पद्धती. या आगीचा थंड हवेत शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि मांस आणि कंदमुळं भाजून खाण्यासाठी उपयोग हे उपयोजन. जेम्स वॅटबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. ती खरी नसली तरी वैज्ञानिक विचारपद्धती समजून घ्यायला उपयोगी आहे. जेम्स वॅटनं उकळणाऱ्या चहाच्या किटलीवरचं झाकण उडताना पाहिलं, तेव्हा तो असं म्हणाला नाही, की आतमध्ये भूत पिशाच्च आहे. त्यानं या निरीक्षणावरून असा तर्क केला, की चहा उकळण्याच्या क्रियेतून, काहीतरी शक्ती तयार झाली आहे, आणि त्यामुळे ते झाकण उडतंय. त्यानं झाकण उचललं, बाहेर येणारी वाफ पाहिली, आणि अनुमान काढलं, की वाफ ही ती शक्ती आहे. ही शक्ती आणखी कुठे वापरता येईल, याचा त्यानं विचार केला, प्रयोग केले, आणि त्यातूनच वाफेवर चालणारं इंजिन अस्तित्वात आलं.

आपण 28 फेबुरवारी हा दिवस, राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून पाळतो, कारण भारताचे विज्ञानाचं पहिलं नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ, सी. व्ही. रामन यांचा संशोधनाचा नोबेल मिळवणारा प्रबंध, 28 फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झाला होता. हा प्रबंध होता प्रकाशाच्या विकरणाच्या नियमांविषयी. झालं असं की परदेश प्रवासाला निघालेले रामन, जहाजाच्या डेकवर उभे होते. वर निरभ्र, निळं आकाश होतं तर सभोवती निळं अथांग पाणी. त्यांच्या जागरूक मनात एकदम प्रश्न उमटला, की हवा आणि पाणी ही दोन वेगळी माध्यमं, त्यांची अंतरंही वेगळी, तरीही रंग निळाच का दिसतो? या छोटया कुतूहलाच्या समाधानार्थ त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं! निरीक्षणातून विचार पुढे जातो तो असा.

आपल्या आजूबाजूला असंख्य घटना घडत असतात, त्यांचं निरीक्षणही आपल्याकडून कळत-नकळत होत असतं. आपल्याला लांबून एखाद्या ठिकाणी धूर दिसला, तर तिथे आग पेटली असणार, हा तर्क आपण करतो. तो आपल्याला पूर्वीच जाणवलेल्या, आग आणि धूर यातील कार्यकारणसंबंधामुळे. आपण काही त्याला दिव्याचा राक्षस, चमत्कार म्हणत नाही.

'उद्या सकाळी मी अमुक करीन.....' असं आपण म्हणतो, तेव्हा हा प्रश्न आपल्याला पडतो का, की उद्या उजाडेलच कशावरून? कारण आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे, आपण असं अनुमान काढलेलं असतं, की ज्या अर्थी गेली 460 कोटी वर्षं सूर्य उगवतोय, त्याअर्थी तो उद्याही उजाडणारच.

अनुमानानंतरची पुढची कडी म्हणजे प्रचितीची किंवा अनुभवांची. आगीत हात घातला की चटका बसतो, यासारखा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो, कोणी जर आग अगदी थंडगार असते असं म्हटलं तर त्याला मूर्खात काढतो. कारण ते प्रत्यक्ष अनुभवलेलं सत्य असतं; पण योग्य शिक्षणाअभावी किंवा अगदी वशिल्याअभावी म्हणा, आपल्याला नोकरी मिळत नाही, हे लक्षात आलं तरीही, एखादी सर्व समस्या सोडवणारी अंगठी घ्यायला, आपण चटकन तयार होतो. समजा हजार सुशिक्षित बेकारांनी, आज याप्रकारच्या अंगठया घेतल्या, तरी त्यातल्या 50% लोकांना तरी नोकऱ्या मिळतील का? नाही. कारण मुळात ती गोष्ट, ही पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. कोणत्याही वैज्ञानिक सत्याचा अनुभव, सप्रमाण म्हणजे पुराव्यांसह, वारंवार म्हणजे पुन्हापुन्हा, आणि सर्वत्र म्हणजे सगळीकडे येत असतो, यायला हवा. गुरुत्वाकर्षण ही वस्तुस्थिती आहे म्हणून वर फेकलेली वस्तू खालीच येणार, मग तुम्ही ध्रुवावर असा नाहीतर विषवृत्तावर असा.

कोणताही निष्कर्ष हा प्रयोगानं तपासून बघता आला पाहिजे हे तर विज्ञानाचं आधारतत्त्वं. 'ज्वलनाला ऑक्सिजनची आवश्यकता असते' असं म्हटलं तर ते सिद्ध करता आलं पाहिजे. मेणबत्ती पेटवून ती उपडया हंडीखाली ठेवली तर हंडीतला ऑक्सिजन संपल्यावर ती विझते, याचाच अर्थ तो वायू ज्वलनाला मदत करतो. पदार्थाचं आकारमान वाढलं किंवा वाढवलं तर त्याची घनता कमी होते असं म्हटलं तर आपल्याला हे करून बघता येतं की लोखंडाचा पातळ पत्रादेखील पाण्यात बुडतो; पण तो वाकवून त्याला होडीचा आकार दिला की तो पाण्यावर तरंगतो. बर्फ हे पाण्याचं घनरूप; पण ते तयार होताना त्याचं अनियमित प्रसरण होत असल्यामुळे त्याची तुलनात्मक घनता कमी होते आणि तेही पाण्यावर तरंगतं.

संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक

Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

🔖 राष्ट्रीय विज्ञान दिन उपयुक्त माहिती

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  २८ फेब्रुवारी-राष्ट्रीय-विज्ञान-दिन

↪️  नोबेल-विजेते-सी-वी-रमन-परिचय

↪️  विज्ञान-म्हणजे-काय?

↪️  विज्ञान-हे-वरदानच

↪️  विज्ञानाची-वैशिष्ट्ये

↪️  MP3-विज्ञान-गीत-डाऊनलोड

🔖 मराठी राजभाषा दिन उपयुक्त माहिती

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  २७-फेब्रुवारी-मराठी-राजभाषा-दिन

↪️  कुसुमाग्रज-वि-वा-शिरवाडकर-परिचय

↪️  कुसुमाग्रज-जीवन-प्रवास

↪️  कुसुमाग्रज-साहित्य-निर्मिती

↪️  जन्म-मराठी-भाषेचा

↪️  मराठीची-बोलू-कौतुके

↪️  माझी-मातृभाषा-मराठी

↪️  मराठी-आमुची-मायबोली

↪️  मराठी-भाषा-गीत-डाऊनलोड

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

أحدث أقدم