स्त्री भ्रूणहत्या एक सामाजिक समस्या
गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या याचे प्रमाण खूपच वाढले आहे. अगतिकतेतून निर्माण झालेली ही मानसिकता आहे. या अगतिकतेची अनेक कारणे आहेत. ग्रामीण आणि शहरी उच्चभ्रू असे वेगवेगळे स्थरही यामध्ये असले तरी याबाबत दीर्घकालीन कारणाचा शोध घेणे आवश्यक आहे.
आज स्त्रीभ्रूण हत्या हा एक चिंतेचा मुद्दा बनत चालला आहे. महाराष्ट्रात बीड जिल्हयाप्रमाणे आता मुंबईतही अशा हत्या झाल्याचे उघड होत आहे. गर्भलिंग परिक्षा आणि मग मुलगी असेल तर गर्भपात हे समीकरण होत चालले आहे. या देशात स्त्री मातेसमान मानतात स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे' किंवा 'घरी मुलगी जन्मली' की 'घरी लक्ष्मी आली' इत्यादी विचार व्यक्त होतात. त्याच भारत देशात आज राजरोजपणे स्त्री भ्रूण हत्या होताना दिसत आहेत. असे का होत आहे हे शोधणे महत्त्वाचे आहे.
गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या या आज काल सुरू झाल्या असे म्हणणे धाडसाचे होईल. हे पूर्वीपासून होत आहे. परंतु याचे प्रमाण आता खूपच वाढले आहे. काय आता आईला मुलगी नको असते की जन्मदात्याला मुलीचा बाप होणे आवडत नाही अशी कोणती मजबूरी असते की स्त्रीसुद्धा हे पाप करायला तयार होते. या सर्व गोष्टींचा विचार करता एक लक्षात येते की ही एक अगतिकतेतून निर्माण झालेली मानसिकता आहे. या अगतिकतेची अनेक कारणे आहेत तसेच ग्रामीण शहरी तसेच उच्चभ्रू असे वेगवेगळे स्थरही आहेत. शहरी आणि उच्चभ्रू वर्गाची स्त्राा भ्रूण हत्येमागची कारणे वेगळी आहेत. त्याचा वेगळा विषय होऊ शकतो.
इथे ग्रामीण आणि शहरी स्थराचा विचार केल्यास अगतिकताच जास्त दिसते. ग्रामीण भागात शेतकरी शेती करून उदरनिर्वाह करतो. वर्षातून एकदाच शेतामध्ये धान्य पिकते. थोडे विकायचे आणि थोडे वर्षभरासाठी घरात ठेवायचे. वर्षभर शेतकर्याला त्यावरच अवलंबून राहावे लागते. ज्यावर्षी दुःष्काळ पडतो तेव्हा शेतकऱ्याची अवस्था अगदीच दयनीय होते. मग सावकार हाच त्यांचा आसरा होतो. मग कोणी दागदागिने तर कोणी आपले शेतच गहाण टाकण्यास मजबूर होतो. एक वितेच्या पोटाचा प्रश्न सोडवायला त्याला हे करावेच लागते. त्यात घरात लग्नाची मुलगी असेल तर मात्र भिक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था होते. वर्षानुवर्षे सावकारी व्याज चुकवण्यात आयुष्य खर्ची होते. ग्रामीण भागातील स्त्री भ्रूण हत्येचे मूळ कर्जबाजारीपणात दडलेले आहे.
जमीन आणि पाणी हे निसर्गाचे भाग आहेत. मानव ते रसायनशास्त्राचा वापर करून तयार करू शकत नाही. दोन द्रव्यांचे मिश्रण केले की झाली तयार नविन जमीन असे होत नाही. पूर्वी जी जमीन शेतकर्यांकडे होती तेवढीच आजही आहे. परंतु आता त्याचे विभक्त कुटूंब पध्दतीमुळे तुकडे झालेत. पूर्वी जिथे कटुबाची सरासरी शेत दहा ते पंधरा एकराचे असायचे ते आता एक दोन एकराचे झाले आहे. कुटूंब वाढली कुटूंब संख्या वाढली शेतीचा आकार मात्र कमी झाला. कसे सांभाळणार शेतकरी आपले कुटूंब? ऋण कुठून आणणार ? अशा शेतकर्याच्या घरात जेव्हा मुलगी जन्म घेते आणि वयात येऊन लग्नाची होते तेव्हा हा शेतकरी खचून जातो.
कायदयाने कितीही बंदी घातलेली असली तरी अद्यापह अस्तित्वात असलेल्या हुंडा देण्याच्या प्रथेला बळी जाऊन लेकीच्या सुखासाठी जावयाला हुंडा देण्यास तयार होतो. पुढे जाऊन बर्याचदा हुंडा कमी पडल्याने आणि मुलीचा बाप जावई हट्ट पुरवण्यात अपुरा पडल्याने हुंडाबळीच्या घटना घडतात आणि मुलीचा बाप पूर्णपणे खचतो आणि मनाने पूर्ण तुटतो. अशात जर घरात एकापेक्षा जास्त मुली असतील तर काय ? अशावेळेस शेतकर्याचा स्वतःवरचा आणि सरकारवरचा विश्वास उडला आहे. शेतकरी हा गावखेडयात रहातो. तो संस्कृती प्रिय आहे. तो सामाजिक बांधलकीची मानतो आणि समाजाला घाबरतो. जाणार्या इभ्रतीला घाबरतो आणि बूजतो. मी देणेकरी आहे या जाणीवेने तो दबून जातो. वराती मागून घोडा आल्यागत सरकारी काम करण्याच्या पध्दतीमुळे आपल्या पाठीशी कोणी ठामपणे उभे आहे हा विश्वासच त्याला उरला नाही. इथेही स्त्री भ्रूण हत्येचे मूळ दडलेले आहे.
अशा अनेक गोष्टीत स्त्रीभ्रूण हत्येचे गूढ दडलेले आहे. शेतकरी आत्महत्या हुंडाबळी किंवा स्त्रभ्रूण हत्या हे एकाच माळेतील तीन मणी आहेत त्यांना वेगवेगळे मोजमाप लावल्यास एकाही प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही अथवा कायम स्वरूपी तोडगा सापडणार नाही. तसेच जोपर्यंत हुंडा देणे घेणे थांबत नाही तोपर्यंत शेतकरी कर्जबाजारी होणे संपणार नाही. तोपर्यंत हुंडाबळीही जातच रहाणार आणि शेतकर्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. स्त्रीभ्रूण हत्याही होत रहाणार कारण ती अगतिकतेतून तयार झालेली मानसिकता आहे.
मुलगी झाली की तिच्या लग्नाचा आणि हुंडयाचा खर्च ते नाही जमले तर हुंडाबळी किंवा बापाने हे सर्व कर्ज काढून केले तर एक दिवस कर्जाचे व्याज वा कर्ज चुकवता न आल्याने मग बापाची आत्महत्या. हे सर्व टाळायचे असेल तर पत्नी किंवा सून गरोदर राहिली की गर्भलिंग चिकित्साकरून मुलगी असेल तर गर्भपात करून शेतकरी मोकळा होतो आणि आपला पुढला खर्च आणि ससेहोलपट वाचवतो.
नुसते मुलांचे वाढते प्रमाण आणि मुलींची घटती संख्या याची आकडेवारी प्रसिध्दकरून किंवा मुलींचा जन्म कसा जरूरीचा आहे यावर प्रकाश टाकून काही फायदा नाही. खरी गरज आहे ती शेतकर्याचे जीवनमान सुधारण्याची. कमी होत चाललेल्या सरासरी शेतीमध्येही जास्तीत जास्त पीक कसे घेता येईल आणि शेतकरी कसा सधन होईल हे बघण्याची. जर आज शेतकर्याला आपण पारंपारिक शेतीकडून आधुनिक शेतकी तंत्रज्ञानाकडे घेऊन जाऊ शकलो तर नक्की त्याला हे जर साधता आले तर तो घरात येणार्या लक्ष्मीचे स्वागतच करेल.
गावोगावी अनेक कसाई आपली दुकाने थाटून बसले आहेत आणि गरीब शेतकर्यांच्या अगतिकतेचा फायदा उठवून धंदा जोरात चालवत आहेत. आता थोडे दिवस कदाचीत ते दुकान बंद ठेवतील. पुढे सारेकाही शांत झाल्यावर पुन्हा सुरू करतील. गरज आहे ती स्त्री भ्रूण हत्येच्या मुळाशी असलेल्या मूलभूत कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाय करण्याची. ही एक तपश्चर्या आहे. हे एक दीर्घकालीन युध्द आहे. ते जिंकण्याची मानसिकता राज्यकर्त्यात हवी.
पोलिओ रोगाचे उच्चाटन करण्यासाठी देशभर मोहीम राबवून आज देशातून हा रोग हद्दपार झाला आहे. म्हणजेच राज्यकर्त्यामध्ये क्षमता आहे. स्त्रीभ्रूण हत्येबाबत देखील मानसिकता राज्यकर्त्यांनी आणि दिर्घकालीन दाखवायला हवी.
साभार : मधुकर राऊत
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
कर्तृत्ववान महिला छोटी भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🎙️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
🔖 जागतिक महिला दिन उपयुक्त भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
↪️ जागतिक-महिला-दिन-सूत्रसंचालन
↪️ जागतिक-महिला-दिन-प्रास्ताविक
↪️ ८-मार्च-जागतिक-महिला-दिन-भाषण
↪️ स्त्री-भ्रूणहत्या-एक-समस्या-भाषण
↪️ स्त्री-भ्रूणहत्या-सामाजिक-समस्या-भाषण
↪️ जागतिक-महिला-दिन-हिंदी-भाषण
↪️ जागतिक-महिला-दिन-इंग्रजी-भाषण
↪️ महिला-लोकशाही-व-शिक्षण-भाषण
↪️ लोकशाही-व-महिलांचे-नाते-भाषण
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻